ऑनलाइनमुळे गरीब विद्यार्थी शिक्षण प्रवाहाबाहेर फेकल्या जातील ! .. हेरंब कुळकर्णीj

ऑनलाइनमुळे गरीब विद्यार्थी शिक्षण प्रवाहाबाहेर फेकल्या जातील !


         .. हेरंब कुळकर्णी


कारंजा:(अमित संगेवार) दी ३१


     अलीकडे ऑनलाइन शिक्षणामुळे गरीब विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण झालेला आहे. 35% मुलांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत .आपले मित्र ऑनलाईन शिक्षण घेतात, मला मात्र घेता येत नाही ,या भावनेने हे विद्यार्थी निराश होतात .आपल्या गुणवत्तेवर परिणाम तर होणार नाही ना ! या भीतीने ते डिप्रेशनमध्ये जातात .भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर गरीब विद्यार्थी हे ऑनलाईन मुळे शिक्षण प्रवाहाबाहेर फेकल्या जातील ,असे मत शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केले .कारंजा येथे सुरू असलेल्या शरद व्याख्यानमालेच्या ऑनलाइन व्यासपीठावरून ते बोलत होते . *"कोरोनामुळे निर्माण झालेले शिक्षण विषयक प्रश्न"* हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता .प्रारंभी शेखर बंग यांनी त्यांचे शब्द सुमनांनी स्वागत केले. परमेश्वर व्यवहारे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. करोनामूळे झालेले परिणाम विशद करताना हेरंब कुलकर्णी पुढे म्हणाले की ,आजतागायत आपण शिक्षणाचा खूप मोठा पल्ला गाठला. गावागावात शाळा पोहोचल्या .उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढले .मात्र करोनामुळे सर्व उलथापालथ झाली. ऑनलाइन शिक्षणामुळे शिक्षकांच्या आवश्यकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले .जगात आठ ते दहा कोटी लोकांचा रोजगार गेला .बेकारीचे प्रमाण वाढले. त्यामुळे दारिद्र्यात वाढ झाली. मजूर ,कामगार ,व्यापारी आदी,भीषण संकटात सापडले .मुलांच्या शिक्षणाला अग्रक्रम देणाऱ्या पालकांनी आज शिक्षणाकडे पाठ फिरवली .मुलांच्या शिक्षणावर खर्च करण्यापेक्षा त्याला काम धंद्यात गुंतवले तर किमान कुटुंबाला तरी हातभार लागेल, असा विचार पालक करीत आहेत आणि यामुळे बालमजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे ते म्हणाले. कोरोना काळात आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने गरीब कुटुंबाला याची खूप झळ सहन करावी लागली. त्यात घरात दोन तीन मुलं शिक्षण घेणारे असतील तर, त्या कुटुंबाची किती वाताहात झाली असेल, हे सांगताना कुलकर्णी म्हणाले शैक्षणिक कारणामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हा संवेदनशील प्रश्न असूनही मीडिया यावर बोलत नाही याची खंतही त्यांनी व्यक्त केली .या काळात ऑनलाइन शिक्षणामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे खिसे भरत असल्याचे सांगताना ते म्हणाले की ,ऑनलाईन शिक्षणामागे अर्थकारण दडले आहे .मोबाईल विक्री, लॅपटॉप' ,हेडफोन ,मोबाईल स्टॅन्ड, नेट पॅक इत्यादीमुळे या कंपन्यांची 24 कोटी वरून 200 कोटीची उलाढाल झाल्याचे त्यांनी सांगितले .सध्या निर्माण झालेली परिस्थिती अशीच कायम राहिली तर शिक्षण पद्धती मोडकळीस येऊ शकते हे विस्ताराने सांगताना ते म्हणाले की ,शिक्षण क्षेत्रात ऑनलाइन पद्धतीने खाजगी क्षेत्रातील तज्ञ मंडळी अध्यापन करतील तसेच होम स्कूलिंग कल्पना समोर येईल. घराघरातून शिक्षण दिल्या जाईल. कारंजातील मुलांना ब्राझील, अमेरिका, इंग्लंड, येथील शिक्षक ऑनलाइन पद्धतीने शिकवतील या सर्व संभाव्य धोक्यामुळे शिक्षकांचे अस्तित्व संपून ही शिक्षणपद्धती मोडकळीस येऊ शकेल ,अशी भीती त्यांनी व्यक्त केली .यावेळी कुलकर्णी यांनी श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली . केतन गोडबोले यांनी शारदास्तवन म्हटले .विजय भड यांनी आभार मानले तर डॉक्टर कविता मिसाळ यांनी संचलन केले.