अनुकंपा पदभरती तात्काळ करण्यासाठी जि.प. समोर ठिया आंदोलन
वाशिम :(जिल्ह्या प्रतिनिधी)
शासन सेवेत रुजू असताना मयत झालेल्या कर्मचार्याच्या एका वारसाला नौकरीत सामावून घेण्याचे शासनाचे धोरण आहे. प्रचलीत शासन निर्णयानुसार रिक्त पदांच्या 20 टक्के अनुकंपा पदभरती करणे आवश्यक असताना वाशिम जिल्हा परिषदेमध्ये 200 पेक्षा जास्त पदे रिक्त असून सुध्दा वाशिम जिल्हा परिषद अनुकंपा पदभरती करीत नसल्यामुळे अनुकंपा पदभरती तात्काळ करण्यात यावी, या मागणीसाठी अनुकंपा धारक संघाच्यावतीने आज दि. 15 ऑक्टोबर 2020 जिल्हा परिषद कार्यालयामध्ये ठिया आंदोलन करण्यात आले.
राज्यात सर्वत्र अनुकंपा पदभरती होत असताना वाशिम जिल्हा परिषदेमध्ये रिक्त पदे असताना सुध्दा अनुकंपा पदभरती करण्यात येत नसल्यामुळे अनुकंपा धारकांना जिल्हा परिषदेसमोर ठिया आंदोलन केले. शासन सेवेत रुजू असताना मयत झालेल्या कर्मचार्याच्या जागेवर एका वारसाला नौकरीत सामावून घेण्यासाठी शासन निर्णय असताना वाशिम जिल्हा परिषद 2018 पासून अनुकंपा धारकांना नौकरीत सामावून घेण्याचे फक्त आश्वासन देत आली आहे. अनुकंपा धारक संघाच्यावतीने वेळोवेळी निवेदन देवून अनुकंपा पदभरती करण्याची मागणी केली असताना जिल्हा परिषद कर्मचारी, अधिकारी अनुकंपा पदभरती करण्यासाठी हलगर्जीपणा करत आले. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 140 अनुकंपा नौकरीपासून वंचीत आहेत. नौकरी अभावी अनुकंपाधारकांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली असून, बरेच अनुकंपा धारक वयोमर्यादेतून बाद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. तर काही वयोमर्यादेतून बाद सुध्दा झाले आहेत. एकवेळेस वयोमर्यादेतून बाद झाल्यानंतर त्या अनुकंपा धारकाच्या जागेवर दुसर्या वारसाचे नाव यादीत सामावून घेण्याचे कोणतेही धोरण नसल्यामुळे तो अनुकंपा धारक नौकरीपासून वंचीत राहतो. असे असताना जिल्हा परिषद मध्ये अनुकंपा पदभरती होत नसल्याने अनुकंपा धारकांची मानसिक स्थिती खालावली जात आहे. नौकरीत सामावून न घेतल्यामुळे व परिवाराच्या आर्थिक परिस्थीतीचा सामना करीत मानसिकरित्या खचलेल्या वाशिम जिल्ह्यातील कारंजा नगर परिषदेतील एका अनुकंपा धारकाने आत्महत्या सुध्दा केली आहे. ही वेळ वाशिम जिल्हा परिषदेतील अनुकंपा धारकांवर येऊ नये, यासाठी वाशिम जिल्हा परिषदेने तात्काळ अनुकंपा पदभरती तात्काळ करण्यासाठी अनुकंपा धारक संघ जिल्हा शाखा वाशिमच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर आज ठिया आंदोलन केले. यावेळी जिल्हा परिषदेच्यावतीने 10 ते 12 दिवसात अनुकंपा पदभरती करण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन स्थगीत करण्यात आले.
या आंदोलनामध्ये अनुकंपा धारक संघाचे प्रदेशाध्यक्ष पंकज गाडेकर, संस्थापक सचिव दिगांबर मानमोठे, जिल्हाध्यक्ष किशोर अवचार, आतीष सावळे, निखील मिसाळ, भारत साबळे, पुरुषोत्तम जाधव, पंढरी जाधव, प्रितम उलेमाले, अशोक मडके, राहुल खाडे, दिनेश घनघाव, मिना अंभोरे, स्वप्नील केळे, विहान स आदींसह जिल्ह्यातील अनुकंपाधारक सहभागी झाले होते