शेतकर्यांच्या न्याय व हक्कासाठी जिल्हा भाजपा मैदानात
माजी कृषी मंत्री डॉ.बोंडे व आ.पाटणींच्या उपस्थितीत आंदोलन
कारंजा: ( अमित संगेवार) दि २८
सततच्या पावसामुळे उदीड, मुगाचे तर परतीच्या पावसामुळे सोयाबीन, कपाशी, तुर तसेच भाजीपाला व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी यासाठी भाजपाच्यावतीने जिल्हा तसेच तालुकास्तरावर आंदोलन करून शासन तसेच प्रशासनाचे लक्ष वेधले होते. राज्य शासन पंचनाम्याचे निर्देश देते मात्र प्रशासनास परवानगी देत नसल्यामुळे एकप्रकारे शेतकर्यांना वेठीस धरून आर्थिक मदत व पिकविम्यापासून वंचित ठेवू पाहत आहे. या विरोधात भाजपा किसान मोर्चा वाशिम जिल्ह्याच्यावतीने २९ ऑक्टोंबर रोजी कारंजा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला माजी कृषी मंत्री तथा भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ.डॉ.अनिल बोंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी, वाशिम विधासनभा मतदार संघाचे आमदार लखन मलिक यांचेसह जिल्ह्यातील सर्व भाजपा व प्रदेश पदाधिकारी, सर्व मंडळ अध्यक्ष यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.
या आंदोलनामध्ये माजी कृषी मंत्री तथा भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ.डॉ.अनिल बोंडे हे उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत व पिकविमा मिळावा यासाठी कारंजा तहसीलदार यांचेमार्फत राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांचेकडे मागणी करणार आहेत. आपल्या न्याय व हक्काच्या लढाईत जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी वाशिम जिल्हा तसेच भाजपा वाशिम जिल्हा किसान आघाडीचेवतीने करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनी धरणे आंदोलनामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधून सहभागी व्हावे अशी विनंती आयोजकांच्यावतीने करण्यात आली आहे.