कोरोना ने माणसाला सजगपणे पाहायला शिकवले डॉक्टर मिलिंद जोशी यांचे प्रतिपादन

कोरोना ने माणसाला सजगपणे पाहायला शिकवले


डॉक्टर मिलिंद जोशी यांचे प्रतिपादन !


       कारंजा:( संदीप क़ुर्हे ) दि २८


     जगात सर्वप्रथम चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला 11 मार्चला पुण्यात पहिला रुग्ण आढळला आणि अतिशय जलद गतीने तो आपल्या घरापर्यंत पोहोचला .यामुळे माणसांना माणसाची भीती वाटू लागली ,आपल्या माणसाविषयी आपल्याला शंका येऊ लागली .हस्तांदोलन, गळाभेट बंद झालं मास्क हा जगण्याचा एक भाग बनला तर सॅनिटाईझरला तीर्थाचे रूप प्राप्त झाले .लॉकडाऊन मुळे सर्व जनता घरात बंदिस्त झाली मात्र कुटुंब संस्थेच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक बाब घडली ती म्हणजे आपल्या मुलाला, पत्नीला ,आई-वडिलांना भरपूर वेळ देता आला म्हणून कोरोनाने माणसाला सजगपणे पाहायला शिकविले, असे मत पुण्याचे मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले .कारंजा येथे सुरू झालेल्या शरद व्याख्यानमालेच्या ऑनलाइन व्यासपीठावरून ते बोलत होते .कोरोनाने आपल्याला काय शिकविले हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता .प्रारंभी प्रमोद दहिहांडेकर यांनी प्रास्ताविक केले. परिचय डॉक्टर पद्माकर मिसाळ यांनी करून दिला . प्रारंभी बाळासाहेब नंदे यांनी शारदादेवीला हारार्पण केला व वक्ते श्री मिलिंद जोशी शाब्दिक यांचे स्वागत केले. याप्रसंगी चीन सीमेवरील चकमकीत व काश्मीर येथील येथी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व कोरोना काळात दिवंगत झालेले डॉक्टर , परिचारिका ,पोलिस ,महसूल कर्मचारी तसेच मालेचे कार्यकर्ते आप्पाजी महाजन , मालेशी संबंधित असलेल्या दिवंगत व्यक्तिंना भावपूर्ण श्रध्दांजली देण्यात आली. कोरोनाने केलेल्या भीषण संहाराचे विश्लेषण करताना पुढे मिलिंद जोशी म्हणाले की ,निसर्ग आपल्याला गरजेपुरते देत असतो मात्र माणसांमध्ये हाव निर्माण होत असल्याने तो झाडांची कत्तल करतो, खाणी खोदतो, खूप टेकड्या व पहाड फोडतो या कृत्यामुळे आपण संकटाच्या खाईत पडत आहोत .या संकटाच्या पाठीमागे निसर्गाची पुनर्निर्माण करण्याची चांगली योजना असते .अनेक साथींच्या रोगांनी माणसाला धडे शिकवले आहेत आणि माणसाने सुद्धा या संकटातून नवीन वाट शोधण्याचे प्रयत्न केले आहेत असे जोशी म्हणाले .


आठ महिन्यात करोनाने जगाचा चेहरामोहरा बदलला आहे. हे सांगताना जोशी म्हणाले की ,लाखोच्या संख्येने महानगरांमध्ये असलेले मजूर या साथीने भयभीत झाले होते त्यांना आपल्या गावी जाण्याची ओढ निर्माण झाली होती. या दरम्यान माणुसकीची अनेक रूपे आपल्याला पाहता आली. आरोग्याच्या पातळीवर आपण किती कमजोर आहोत याची कल्पना आली. वर्क फ्रॉम होम हा या काळात जीवनशैलीचा एक भाग बनला .आर्थिक पातळीवर देशाचे ,जगाचे अतोनात नुकसान झाले.अनेकांचा रोजगार गेला. मना मनात निराशा निर्माण झाली व अनाथांचे ,दिव्यांगाचे हाल झाले. पंढरीची वारी होऊ शकली नाही. शाळा बंद पडल्या . ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू झाली परंतु यामध्ये वंचित घटकापुढे ऑनलाइन शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. या काळात एक आशेचा दीप म्हणून माणसं पुस्तकाकडे वळली ,घराघरात ,गावागावात स्वच्छता निर्माण झाली .कोरोना मुळे आपल्या संस्कृतीवर फार मोठा बदल झाला. कोरोनावर लस निर्माण होईपर्यंत संधी शोधणे, सुरक्षित राहणे आणि सकारात्मक विचार करणे हे आपल्या हातात आहे .नवीन पिढीला निराशेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना नवीन वाट दाखविणे हे आपले कर्तव्य ठरते .या भीषण संकटाला सर्वांनी एकजुटीने सामोरे गेल्यास भविष्यात आपल्याला आशेचा किरण दिसल्या शिवाय राहणार नाही ,असा आशावाद जोशी यांनी व्यक्त केला .


निशिकांत परळीकर यांनी शारदास्तवन म्हटले .श्रीनिवास जोशी यांनी आभार व्यक्त केले तर डॉक्टर सुशिल देशपांडे यांनी संचलन केले.