जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा २ सप्टेंबरपासून नवीन नियमावली लागू

 जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा


    २ सप्टेंबरपासून नवीन नियमावली लागू


वाशिम, दि. ०१ (जिमाका) :


जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देवून २ सप्टेंबरपासून नवीन नियमावली लागू करण्यात येत असून ३० सप्टेंबर २०२० पर्यंत ही नियामवली लागू राहणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना, सेवा सांयकाळी ७ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच दवाखाने (पशुवैद्यकीय दवाखान्यांसह), मेडिकल स्टोअर्स २४ तास सुरु राहतील. मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून हॉटेल, लॉज पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास तसेच खासगी प्रवाशी वाहतुकीस परवानगी राहील, असे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी ३१ ऑगस्ट २०२० रोजी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.


नवीन नियमावलीनुसार हॉटेल आणि लॉजेस पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असून याकरिता स्वतंत्र ‘एसओपी’ निर्गमित केली जाणार आहे. खुल्या जागेत शारीरिक कसरत, व्यायाम करण्यास मुभा राहणार आहे. तसेच आंतरजिल्हा प्रवाशी व माल वाहतुकीला आता कोणत्याही परवानगीची अथवा ई-पासची आवश्यकता असणार नाही. खाजगी प्रवाशी बस, मिनी बस आणि मालवाहतूकदार यांना प्रवाशी वाहतूक करण्यास परवानगी राहील. त्याबाबत महाराष्ट्र परिवहन आयुक्त यांच्याकडून स्वतंत्र मार्गदर्शक सूचना निर्मित केल्या जाणार आहेत.


       दुचाकीवरून दोन व्यक्तींना प्रवासाची मुभा राहील. मात्र हेल्मेट व मास्क वापरणे बंधनकारक असेल. तीन चाकी वाहनांमध्ये चालक व दोन व्यक्तींना, तर चारचाकी वाहनांमध्ये चालक व ३ व्यक्तींना प्रवास करण्यास मुभा राहील. नगरपरिषद क्षेत्रातील पेट्रोलपंप सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहील, हाय-वे वरील पेट्रोलपंप २४ तास सुरु राहू शकतील. लग्न समारंभ कार्यक्रमासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाच्या अधीन राहून जास्तीत जास्त ५० व्यक्तींना परवानगी राहील. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० व्यक्तींना मुभा राहील.


शाळा, महाविद्यालये बंदच राहणार


जिल्ह्यात सर्व शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस इत्यादी ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहतील. मात्र ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरु राहतील. सिनेमागृह, व्यायामशाळा, मनोरंजन पार्क, जलतरण तलाव, सभागृह, नाट्यगृह, बार बंद राहतील. कोणतेही सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व सर्व प्रकारच्या मेळाव्यांवर बंदी राहणार आहे.


मास्कचा वापर बंधनकारक; सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड


सार्वजनिक ठिकाणी, सरकारी-निमसरकारी व खाजगी कार्यालयात, आस्थापनेत तसेच प्रवासादरम्यान नाका-तोंडावर मास्क, रुमाल, गमछा इत्यादीचा वापर बंधनकारक राहील. मास्क, रुमाल, गमछा इत्यादीचा वापर न केल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी अथवा कार्यालयीन कामाच्या ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन, पण व तंबाखू खाण्यास प्रतिबंध राहील. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. दोन व्यक्तिगत अंतर किमान ६ फुट इतके आवश्यक आहे.


सोशल डिस्टसिंगचे पालन, स्वच्छता आवश्यक


सर्व आस्थापनाधारक, दुकानदारांनी ग्राहकांमध्ये किमान ६ फुटचे अंतर राहील, याची दक्षता घ्यावी, तसेच एकावेळी ५ पेक्षा जास्त ग्राहकांना आस्थापना अथवा दुकानात प्रेवेश देवू नये. व्यक्तींच्या संपर्कात येणारी ठिकाणे, वस्तूंचे सातत्याने निर्जंतुकीकरण करावे. सर्व आस्थापनांनी सोशल डिस्टसिंगचे पालन होण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्यात, जसे शिफ्टमध्ये काम करणे, कामगारांना मध्य भोजनासाठी वेगवेगळ्या वेळा ठरवून देणे. हॅण्डवॉश, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर इत्यादी बाबींची तजवीज संबंधित आस्थापना, प्रतिष्ठान यांनी करावी. त्यांचा वापर प्रवेशद्वारावर सातत्याने करावा. शक्य असेल तेथे कार्यालये, कामाची ठिकाणे, दुकाने, बाजारपेठा आणि औद्योगिक क्षेत्रे आणि व्यापारी संस्था यांनी वर्क फ्रॉम होम करावे.


राज्य शासनाच्या १९ मे २०२० आणि २१ मे २०२० चे आदेश आणि त्यामध्ये राज्य व केंद्र शासनाने केलेल्या सुधारणानुसार निश्चित केलेल्या निकषानुसार यापुढेही प्रतिबंधित क्षेत्र अस्तित्वात राहतील. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांना ह्या आदेशात बदल करून किंवा नवीन आदेश पारित करून या आदेशाच्या विसंगत असा कोणताही आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष यांच्या पूर्वपरवानगीशिवाय पारित करता येणार. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६०, भारतीय दंड संहीता १८६० चे कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.