ऑक्टोबर पासून ‘रेनॉल्ड हॉस्पिटल’ येथे डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर • ३४ बेडची सशुल्क सुविधा; ८ ऑक्सिजन बेड

१ ऑक्टोबर पासून ‘रेनॉल्ड हॉस्पिटल’ येथे डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर


   • ३४ बेडची सशुल्क सुविधा; ८ ऑक्सिजन बेड


 


वाशिम  (संदीप क़ुर्हे) दि. २८ : 


    कोविड १९ च्या अनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून वाशिम शहरातील रेनॉल्ड मेमोरियल हॉस्पिटल येथे डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज, २८ सप्टेंबर रोजी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. १ ऑक्टोबर पासून सदर कोविड हेल्थ सेंटर सुरु होईल. त्यामुळे कोरोना विषयक चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींना निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी ३४ बेडची सशुल्क सुविधा उपलब्ध होईल, त्यापैकी ८ ऑक्सिजन बेड असतील.


   ‘आयसीएमआर’ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे तसेच महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे व मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे, तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचारी, अधिकारी वर्ग चोवीस तास नियमितपणे उपस्थित ठेवणे, निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या व्यक्तींची माहिती गोपनीय ठेवणे, तसेच हेल्थ सेंटरमध्ये पुरेशा प्रमाणात प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्निशियन), रुग्णवाहिका असणे बंधनकारक राहणार आहे.


   ज्या व्यक्ती निरीक्षणाखाली ठेवण्यात येतील त्या वैद्यकीय कक्षात यासंदर्भात काम करणारे हॉस्पिटलचे मनुष्यबळ व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याशिवाय इतर कोणालाही प्रवेश राहणार नाही. तसेच याठिकाणी आलेल्या व गेलेल्या प्रत्येक व्यक्तींच्या आवश्यक नोंदणी ठेवणे बंधनकारक राहील. तसेच सदर क्षेत्र हे फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.