नगर परिषद कारंजा तर्फे ११३० श्री गणेश मूर्तींचे विधीपूर्वक विसर्जन

श्री गणरायाला कारंजा येथे शांततेत निरोप


बाप्पा मोरया’ कोरोनापासून मुक्ती द्या! ‘पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष


नगर परिषद तर्फे ११३० श्री गणेश मूर्तींचे विधीपूर्वक विसर्जन* 


कारंजा (अमित संगेवार) 


        शहरातील गणेश भक्तांनी मोठ्या शांततेत भक्ती भावाने गणरायाला निरोप दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच नगर पालिकेने सार्वजनिक व खाजगी श्री गणेशाच्या मूर्तींचे संकलन करून मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्या मार्गदर्शनाखाली विधीवत नदीत विसर्जित करण्यात आले आहे.


      दरवर्षी गणेशोत्सव अतिशय थाटामाटात साजरा केला जातो.यंदा कोरोनाच्या सावटामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला नागरिकांनी घरातच व फिरत्या हौदांमध्ये विसर्जन करुन निरोप दिला.अनंत चतुर्दशीला अकरा दिवसांच्या गणरायाचे विसर्जन होते.दि.२ सप्टेंबर मंगळवारी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. मात्र कोरोना संकटाच्या काळात सर्वच सण, उत्सव साधेपणाने साजरा होत असताना गणेश विसर्जनदेखील साध्या पद्धतीने करण्यात आले आहे. यंदा राज्य सरकारने आखून दिलेल्या नियम-अटींनुसार गणरायाची कमी उंचीची मूर्ती सर्व सार्वजनिक मंडळांमध्ये ठेवण्यात आली होती. तसेच भाविकांनी त्यांच्या जवळील कृत्रिम तलावात किंवा घरीच बाप्पाचे विसर्जन करावे,असे आवाहनही सरकारने केले होते. शिवाय, पालिका, स्थानिक प्रतिनिधींच्या वतीनेही गणरायांना एकत्र घेऊन सामुहिक विसर्जन करण्यात आले आहे.दरम्यान कुठेही ढोल, ताशांच गजर नाही, कुठेही मिरवणुका नाही अशी स्थिती होती. केवळ टाळच्या गजरात बाप्पांचा जयघोष करीत परस्पर मूर्ती विसर्जन करण्यात आले. यासाठी कारंजा पालिकेतर्फे विविध ठिकाणी विसर्जन रथ तयार करण्यात आले होते. मूर्ती स्विकारण्यासाठी विशेष वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामध्ये ११३० मूर्तींचे संकलन करून विधिवत विसर्जन करण्यात आले. या करिता कारंजा नगर पालिकेचे मुख्याधिकारी दादारावडोल्हारकर,उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर,आरोग्य निरीक्षक विनय वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्टपणे नियोजन करून शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात श्री गणरायाला निरोप देण्यात आले.दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील,शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता