*दुकाने, आस्थपाना सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार,१ ऑगस्ट पासुन नवीन नियमावली लागू

दुकाने, आस्थपाना सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार


 


आजपासून सुधारित नियमावली लागू


• आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची सुविधा सुरु राहणार


 


वाशिम:: दि. ३१ :


    जिल्ह्यात ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत लॉकडाऊन लागू राहणार असून याबाबतची सुधारित नियमावली १ ऑगस्ट २०२० पासून लागू करण्यात येत आहे. जिल्ह्यात यापूर्वी परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना, सेवा सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच दवाखाने (पशुवैद्यकीय दवाखान्यांसह), मेडिकल स्टोअर्स २४ तास सुरु राहतील. मात्र, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास अथवा अशा ठिकाणी गर्दी आढळून आल्यास या आस्थापना, दुकाने बंद करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी ३० जुलै रोजी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे. 


 


नवीन नियमावलीनुसार कृषि उत्पन्न बाजार समितीमधील सर्व प्रकारची कामे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहतील. दुध संकलन व विक्री, भाजीपाला बाजार सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु ठेवता येईल. सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत केवळ दुध संकलनास मुभा राहील, याकाळात दुध विक्री करता येणार नाही. पिण्याचे पाणी, घरगुती गॅस घरपोच करण्यास सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुभा राहील. जिल्ह्यातील नगरपालिका हद्दीतील पेट्रोलपंप सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत, तर नगरपालिका हद्दीबाहेरील पेट्रोलपंप २४ तास सुरु ठेवता येतील. सर्व बँका सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहतील. महामार्गांची कामे पूर्वीप्रमाणे सुरु राहतील. वृत्तपत्र छपाई व वितरण आवश्यक खबरदारी घेवून करता येईल.


     लग्न समारंभ, अंत्यविधीसाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाच्या अधीन राहून जास्तीत जास्त २० व्यक्तींना परवानगी राहील. लग्न समारंभाचा कार्यक्रम वगळता इतर सामुहिक भोजनाच्या कार्यक्रमास बंदी राहील. खुल्या मैदानावर, लॉन्सवर, वातानुकुलीत नसलेल्या हॉलमध्ये २० व्यक्तींच्या मर्यादेत लग्नसोहळा संबंधित कार्यक्रम शासनच्या २३ जून २०२० रोजीच्या आदेशाच्या अधीन राहून करता येतील. 


शाळा, हॉटेल, सिनेमागृह, धार्मिक स्थळे बंद


     जिल्ह्यात सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस इत्यादी बंद राहतील. मात्र शिकविण्याच्या उद्देशाशिवाय इतर बाबींसाठी जसे, पेपर तपासणी, निकाल घोषित करणे, ई-लर्निंग, ई-सामग्री तयार करण्यासाठी शाळांचे कामकाज ठेवता येईल. विलगीकरणासाठी परवानगी दिलेल्या हॉटेल्स व्यतिरिक्त इतर हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इतर आतिथ्य सेवा, सिनेमागृह, जिम्नॅशियम, जलतरण तलाव बंद राहतील. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व सर्व प्रकारच्या मेळाव्यांवर बंदी राहणार आहे. सर्व धार्मिकस्थळे, प्रार्थनास्थळे सामान्य व्यक्तींसाठी बंद राहतील. कोणत्याही परिस्थितीत धार्मिक सभा, धार्मिक परिषद, धार्मिक मेळावे भरविता येणार नाहीत. आठवडी बाजार, गुरांचे बाजार बंद राहतील. 


   इनडोअर क्रीडा प्रकार बंद; काही आऊटडोअर खेळांना मुभा


          क्रीडा संकुलाचा बाह्य परिसर, मैदाने नागरिकांना व्यायामासाठी खुली राहतील. मात्र, याठिकाणी सामुहिक खेळ खेळण्यास बंदी राहील. व्यायामासाठी जाणाऱ्या व्यक्तींनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक राहील. इनडोअर क्रीडा संकुल, जिम, खेळावर पूर्णतः बंद राहतील. जिम्नॅस्टिक्स, टेनिस, मैदानावरील बॅडमिंटन आणि मल्लखांब अशा आऊटडोअर असांघिक खेळांना ५ ऑगस्ट २०२० पासून स्वच्छता विषयक उपायांसह परवानगी देण्यात येत आहे. सलून, स्पा, हेअर कटिंगची दुकाने, ब्युटी पार्लर्स या अगोदर निर्गमित केलेल्या बंधनांसह सुरु राहतील. 


 


दुचाकीवर दोघांना प्रवासाची मुभा, हेल्मेट बंधनकारक


     दुचाकीवरून दोन व्यक्तींना प्रवासाची मुभा राहील. मात्र हेल्मेट व मास्क वापरणे बंधनकारक असेल. तीन चाकी वाहनांमध्ये चालक व दोन व्यक्तींना, तर चारचाकी वाहनांमध्ये चालक व ३ व्यक्तींना प्रवास करण्यास मुभा राहील. जास्तीत जास्त ५० टक्के क्षमतेसह जिल्ह्यांतर्गत केवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाहतुकीला परवानगी राहील. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन व निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील. आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक बंद राहील. सर्व प्रकारची मालवाहतूक व रिकाम्या वाहनांची वाहतूक सुरु राहील. दोन जिल्ह्यांमधील प्रवासी वाहतुकीची व्यवस्था पूर्वीप्रमाणेच नियंत्रित राहील. जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी अथवा जिल्ह्यात येण्यासाठी ई-पास बंधनकारक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, स्वच्छता कर्मचारी आणि रुग्णवाहिका यांना प्रवासासाठी कोणताही प्रतिबंध राहणार नाही. 


 


मास्कचा वापर बंधनकारक; सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड


    सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडावर मास्क, रुमाल, गमछा इत्यादीचा वापर बंधनकारक राहील. मास्क, रुमाल, गमछा इत्यादीचा वापर न केल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी अथवा कार्यालयीन कामाच्या ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन, पण व तंबाखू खाण्यास प्रतिबंध राहील. सार्वजनिक ठिकाणी व वाहतुकीच्या साधनांमध्ये सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. व्यक्तिगत अंतर किमान ६ फुट इतके आवश्यक आहे. 


     सर्व आस्थापनाधारक, दुकानदारांनी ग्राहकांमध्ये किमान ६ फुटचे अंतर राहील, याची दक्षता घ्यावी, तसेच एकावेळी ५ पेक्षा जास्त ग्राहकांना आस्थापना अथवा दुकानात प्रेवेश देवू नये. व्यक्तींच्या संपर्कात येणारी ठिकाणे, वस्तूंचे सातत्याने निर्जंतुकीकरण करावे. सर्व आस्थापनांनी सोशल डिस्टसिंगचे पालन होण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्यात, जसे शिफ्टमध्ये काम करणे, कामगारांना मध्य भोजनासाठी वेगवेगळ्या वेळा ठरवून देणे. हॅण्डवॉश, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर इत्यादी बाबींची तजवीज संबंधित आस्थापना, प्रतिष्ठान यांनी करावी. त्यांचा वापर प्रवेशद्वारावर सातत्याने करावा. शक्य असेल तेथे कार्यालये, कामाची ठिकाणे, दुकाने, बाजारपेठा आणि औद्योगिक क्षेत्रे आणि व्यापारी संस्था यांनी वर्क फ्रॉम होम करावे, असे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद केले आहे.