कारंजा नगरपरिषद मार्फत वैशिष्ट्यपुर्ण निधी अंतर्गत सुरू असलेले सभागृहाचे बांधकाम निकृष्ट व असमाधानकारक असल्याची नगरसेविकेची तसेच स्थानिक नागरिकांची तक्रार
बांधकाम अपूर्ण व सुरू असतांनाच दिले अंतिम देयके दिल्याचा आरोप
कारंजा: (विशेष प्रतिनिधि)
शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये कारंजा नगर परिषद मार्फत महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत मातोश्री कॉलोनी, सुंदर वाटिका ,नूतन कॉलोनी येथे सभागृह, खुली व्यायामशाळा निर्माण करण्याचे मागील एक वर्षेपासून सुरू आहे. सदरहू सभागृह हे लाखो रुपयांचे असून तिन्ही सभागृहाची एकत्रित किंमत पाहता कोटी च्या घरात जाते. सद्यस्थिती पाहता मातोश्री कॉलोनी व सुंदर वाटिका येथील सभागृहाचे बांधकाम पाहता हे सभागृह केवळ शोभेची वस्तू बनली आहे.सभागृहाचा बांधकाम दर्जा निकृष्ट तसेच वापरलेल्या साहित्याचा दर्जा सुद्धा तकलादू
असल्याची माहिती खुद प्रभागातील नगरसेविका सौ प्राजक्ता माहितकर यांनी वारंवार नगर परिषद प्रशासनाला दिली असल्याची माहिती दिली परंतु यांची कुठलीही दखल घेतली गेली नाही. लावण्यात आलेले लाखो रुपयांचे व्यायामाचे साहित्य वापरण्याजोगे नसून नुकसानकारक आहेत. मातोश्री कॉलोनी येथील विंधन विहीर सुरुवातीपासूनच बंद अवस्थेत आहे.सभागृहाचे छत गळत असून भिंती पाझरत आहे.रेन वाटर हार्वेस्टिंगची कुठलीच सोय केली गेली नाही.सुरक्षा भिंत अपूर्ण व सुमार दर्जाची आहे,यानंतर धक्कादायक बाब ही लक्षात आली की बांधकाम अपूर्ण असताना संबंधित ठेकेदारास अंतिम देयके/बिलं सुद्धा नगर परिषद ने दिले आहे. कुठल्याही प्रकारची खातरजमा न करता बिल कशे काढण्यात आले ? याबाबतची तक्रार नगरसेविका सौ माहितकर व स्थानिक नागरिकांनी मा.जिल्हाधिकारी, मा.आमदार राजेंद्रजी पाटणी, मा.नगराध्यक्ष यांच्याकडे दिली असून.यावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. वैशिष्ट्य पूर्ण निधी तील हे काम म्हणजे मा. आमदार पाटणी साहेब व नगरसेविका सौ.माहितकर यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.या माध्यमातून स्थानिक नागरिकांच्या मूलभूत सोयी मध्ये भर पडणार आहे. तसेच शहरात प्रथमच नगरपरिषद क्षेत्रात खुली व्यायामशाळा सुरू करण्याची अभिनव संकल्पना सौ.माहितकर यांची आहे परंतु ठेकेदार व न.प.प्रशासन यांच्या संगनमताने शासनाच्या या निधीचा अपव्यय होताना दिसून येत आहे.साध्या लहान लहान कामांवर देखरेखी साठी इंजिनिअर नियुक्त करणारी नगर परिषद या कोट्यवधी रुपयांच्या कामावर देखरेखीसाठी एकही कर्मचारी ठेवला
नसल्याचे आश्चर्य वाटत असल्याची प्रतिक्रियास नगरसेवीकेनी व्यक्त केली आहे