*ओव्हर कॉन्फिडस*

*ओव्हर कॉन्फिडन्स.*


 


       मागच्या महिन्याच्या तुलनेत आता मात्र आपल्याकडील चित्र कमालीचे बदललेले आहे. जे लोकं फक्त करोना च्या नावानेसुद्धा मानसिकरित्या आजारी पडायचे, दवाखान्यात जायचे, तेच आता तसे लक्षणे दिसल्यावरही मला करोना होऊच शकत नाही..! असा ओव्हर कॉन्फिडन्स बाळगत असल्याचे दिसत आहे. तसे आपला सुरक्षित जिल्हा बाहेरून आलेल्या लोकांनी बाधित केला आहे. अलेल्यांचा कोरंटाइन पिरियड संपून पंधरा ते वीस दिवस झालेत. त्यातील पोसिटीव्ह असणारे , पण डिटेक्ट न झालेले आता सर्वांच्या हळूहळू अनेक कारणांनी संपर्कात येत आहेत. मार्केटमध्ये विविध कारणांनी ग्रामीण भागातील लोकं दिसत आहेत. येणे सुद्धा जरुरी आहे. बी बियाणे, खत, शेती उपयोगी साहित्ये, बँकेचे काम, औषधी या सर्वांच्या अनुषंगाने येणारे कामे घेऊन ग्रामीण जनता तालुका व जिल्हा गाठतीलच. या सोबतच शहरी लोकं सुद्धा अनेक कारणांनी मार्केटमध्ये दिसतात. पण यामध्ये विचार केल्यास थोडा बहुत हातभार काही लोकं प्रशासनाला लावू शकतात. ते म्हणजे, वयोवृद्ध , विद्यार्थी, युवक, युवती, बालक. हे लोकं जर अजिबातच घराबाहेर पडले नाही तर बराच धोका टळू शकतो. जर का प्रत्येकाने घरातील बाहेर पडण्यासंबंधी व्यवस्थापन नीट केले तर यात बरेच काही साध्य होऊ शकते. बाहेर व बाजारात विनाकारण आवश्यक नसणारे साहित्य आणण्यासाठी बरेच मुले मुली, वयोवृद्ध व महिला दिसतात. ते घेत असलेल्या वस्तू अजिबातच अर्जंट नसतात असे बऱयापैकी निदर्शनास येत आहे. यात अपवादात्मक असू शकतात पण बहुतेकवेळा विनाकारण वाटते. सिनियर सिटीझन्स ला लागणारे औषध गोळ्या किंवा इतर बाबी घरातील मोठी व्यक्ती आणू शकते. विद्यार्थी, युवक मंडळीना तातडीचे असे काहीच नाही, ते सुद्धा मोठ्यांना सांगू शकतात. महिलां सुद्धा संयम बाळगू शकतात. तसे तर सर्वांनीच अतिआवश्यकता असल्यासच बाहेर निघावे अन्यथा काहीही गरज नाही. कारण आता फक्त एकमेव उपाय राहिला आहे आणि तो म्हणजे बाहेर न निघणे. आपला भाग लवकरच मुंबई होण्यास वेळ लागणार नाही. 


    गेल्या तीन महिन्यांपासून धावपळ करणारे प्रशासन आता मानसिकरित्या थकले आहे. शारीरिकरित्या जरी ते तत्परतेने कार्य करीत आहेत तरी त्यांच्या भावनांचा विचार करावा लागेल. विनाकारण अट्टाहासाने त्यांना विचलित करू नका. बनावट इमर्जन्सी कारणाने फिरू नका. तुम्ही त्यांना न फसवता तुम्हालाच फसवत आहे. त्या सर्वांचेच पेशन्स संपत आहेत पण आता वेळ जनतेला त्यांच्या भावना समजून घेण्याची आहे. त्यांना त्यांनी न सांगताच सहकार्य करण्याची आहे. पोलीस सूचना देण्याची वाट बघू नका. तुम्हीच नियम मोडणाऱ्यांना सूचित करा. कुणी विनामास्क दिसला की त्याला सांगा. सोशल डिस्टनिंग पाळायला सांगा. गर्दी टाळा. संशयित असेल तर त्याला दवाखान्यात पाठवा. विनाकारण फिरणार्यांना ताकीद द्या. एकमेकांना सूचित करा. कारण आता फक्त आपल्या हातात हेच आहे. आपला जीव आपणच वाचवू शकतो, मात्र गंभीर झालो तर.. मला काहीही होणार नाही या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये अजिबात राहू नका..!


 


आशिष बंड जैन.