शेतकऱ्यांच्या हेक्टरी अनुदानाला ग्रहण; ३.३४ कोटी प्रलंबित लवकर देण्याची आ राजेन्द्र पाटनी यांची मागणी

आमदार पाटणी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 





शेतकऱ्यांच्या हेक्टरी अनुदानाला ग्रहण; ३.३४ कोटी प्रलंबित!
कारंजा: ( कारंजा वृत्तकेसरी) दि 11 

 

       नोव्हेंबर २०१९ मध्ये क्यार व महाचक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अवेळी पावसामुळे  पिकांचे नुकसान झाले होते. मात्र अद्यापही कारंजा व मानोरा तालुक्यातील बहुतांश शेतकरी अनुदानापासुन वंचित आहेत. अशातच संचारबंदी व खरिप हंगाम समोर असल्यामुळे वंचित शेतकर्‍यांचे ३ कोटी २४ लक्ष ५४ हजार रूपये  शासनाने शेतकर्‍यांच्या खात्यात त्वरित जमा करावे अशी मागणी आ.राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांचेकडे केली आहे.
        आमदार पाटणी म्हणाले, नुकसान झालेल्या आपदग्रस्त शेतकर्‍यांना २ हेक्टरपर्यंत मर्यादीत क्षेत्राकरिता राज्यपाल महोदयांनी   प्रति हेक्टरी ८ हजार तर फळबाग शेतकर्‍यांना प्रति हेक्टर १८ हजार रूपयांचे अनुदान जाहीर केले होते.  टप्प्या-टप्प्याने  प्राप्त  होणारे  अनुदान गावनिहाय शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 
जमा होत असल्यामुळे शेतकरी निश्चित होते.  अखेर प्रतिक्षा संपल्यानंतर याबाबत शेतकरी संबंधित तहसील कार्यालायाकडे वारंवार चकरा मारून विचारणा करायचे. मानोरा तालुक्यातील  ४० गावातील २२३४ शेतकर्‍यांचे १ कोटी ८० लक्ष ५१०० रूपये तर कारंजा तालुक्यातील ६ गावातील १९७५ शेतकर्‍यांचे १ कोटी ४४ लक्ष ४९ हजार ५७२ असे एकुण ३ कोटी २४ लक्ष ५४ हजार ६७२ रूपयांचे अनुदान अद्यापही प्रलंबित आहे. कारंजा तसेच मानोरा तहसील कार्यालयामार्फत शासनाकडे अनुदान पुरवठा मागणी करण्यात आली मात्र अद्यापही अनुदानाची रक्कम मंजुर नसल्यामुळे आमदार पाटणी यांनी याबाबत मा.मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांचेकडे निवेदनाव्दारे मागणी केली आहे. शेतकरी वर्गातुन याबाबत वारंवार विचारणा होत असुन प्रलंबित अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी संबंधित विभागाला आदेश करावे करिता त्यांनी  विनंती केली आहे.