कोरोनाच्या मुकाबल्यासाठी कारंजा नगरपालिका सज्ज ,मुख्याधिकारी डॉ अजय कुरवाड़े यांचे नागरिकांना भावनीक आवाहन


कारंजा ( सा कारंजा वृत्तकेसरी)
'कोरोना'चा मुकाबला करण्यासाठी कारंजा नगरपालिका सज्ज झाली आहे. रस्ते - गटारींची दैनंदिन सफाई, कचरा उठाव, डास निर्मूलनासाठी औषध फवारणी,अत्याधुनिक जेटींग मशीनव्दारे सोडियम हायपोक्लोराईड सारखे जंतुनाशक फवारून विशेष लक्ष केंद्रित करून निर्जंतुकीकरण करण्यात येत असल्याची माहिती मुख्यधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली आहे. 
       परदेशातून आणि मुंबई, पुणे आदी कोरोनाचा संसर्ग झालेल्या शहरातून कारंजा मध्ये आलेल्यांचा घरोघरी जाऊन शोध घेतला जात आहे, त्यासाठी प्रत्येक प्रभागाकरिता दोन अधिकारी नेमण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना संसर्गित शहरातून कारंजा मध्ये आलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांना आपापल्या घरातच स्वतंत्र राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.परंतु, त्यापैकी काही मंडळींकडून त्याचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.अशांसाठी शहरात विविध ठिकाणी सक्तीची विलगीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहे. न.प.आरोग्य निरीक्षक विनय वानखडे यांच्या देखरेखीखाली नगरपालिके तर्फे आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांची आरोग्य तपासणी करवून घेण्यात आली आहे.त्यांना मास्क,सॅनिटायझर, साबण आदी वस्तु पुरविण्यात आल्या आहेत.स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात त्यांना विशेष.सूचना देण्यात आली आहे.तसेच नगराध्यक्ष शेषराव ढोके,आरोग्य सभापती सलीम गारवे यांच्यासह विविध विभागातील सभापती तसेच नगरसेवक या कार्याला मदत व मार्गदर्शन करीत आल्याची माहिती डॉ.कुरवाडे यांनी दिली आहे.


*-घंटागाडीवरून आवाहन...!* 
कोरोनाचा संसर्ग आणि फैलाव रोखण्यासंदर्भातील आवाहन कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीवरील लाऊडस्पिकरवरून करण्यात येत असून जनतेकडून सुध्दा प्रतिसाद मिळत आहे.



बाहेरून शहरात आलेेेल्या नागरिकांना सक्तीने 'होम क्वारंटाईन' करण्यात आले आहे.त्या घरातील कचरादेखील स्वतंत्रपणे जमा करून त्याची विल्हेवाट शास्त्रीयपध्दतीने लावली जात आहे. 
कोरोना विरोधातील लढाईसाठी नगरपालिका आवश्यक ती सर्व काळजी घेत असून नागरिकांनी आपल्या घरातच थांबून संसर्गाव्दारे पसरणा-या या आजाराची साखळी खंडीत करण्यात आपले योगदान द्यावे आणि आपल्या स्वत:च्या आणि इतरांच्या आरोग्याचे रक्षण करावे असे आवाहन मुख्याधिकारी डॉ अजय कुरवाडे याांनी केले आहे