वाशिम, दि. ०३ (जिमाका) : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात १५ एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात एकाच ठिकाणी होणारी लोकांची गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे ७ एप्रिल रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. पहिल्या सोमवारी शासकीय सुट्टी येत असल्यास त्यानंतरच्या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी हा लोकशाही दिन आयोजित केला जातो. मात्र, ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात १५ एप्रिल २०२० पर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. या कालावधीत अत्यावश्यक कारणाशिवाय लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच एकाच ठिकाणी लोकांनी एकत्र येण्यास सुध्दा प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे ७ एप्रिल रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
*****