कोरोना आमची लायकी दाखवलिस तू ...................?
एप वानरापासून आदिमानव..........होमोहॅबिलीस ..........होमो इरेक्टस.........निऍडरथाल मॅन ते होमो सेपियन ते होमो सेपियन सेपियन.आम्ही पार अंधारयुगातुन हे अवकाशीय युग गाठले.माहीत नाही आणि आठवतही नाही की उत्क्रांतीच्या कोणत्या टप्प्यावर आम्ही विसरलो,की हे आकाश,ही धरती,हा समुद्र सगळं काही फक्त आमचाच नाही आहे.हा आहे, इथंराहणाऱ्या,सरपटणाऱ्या, इथं मुक्तपणे विहारणाऱ्या, आणि स्वच्छन्दपणे वावरणाऱ्या प्राण्यांचा पक्ष्यांचा आणि सर्व सजीवांचा. कोणत्या तरी क्षणी आम्ही उत्क्रांत झालो आणि भानच गमावून बसलो.पृथ्वीला आणि आकाशाला पाडलेली अगणित छिद्रे आमचीच तर देण आहेत.कधीतरी गरज म्हणून वृक्षांची सालं अंगाला गुंडाळली होती!केव्हा केव्हा प्राण्यांची कातडीही नेसली.....! पण,ती गरज म्हणून.एक शिकारी म्हणून.एक व्यापारी म्हणून नव्हे.म्हणून कोरोना तेव्हा तू आला नसशीलच,कारण तेव्हा तुला उतरावयाचा नव्हता आमचा उन्माद. कारण तेव्हा तो नव्हताच.आम्हाला वेगाने धावता येत नव्हते, वाघासारखे,आम्ही ताकतवानही नव्हतो, हत्तीसारखे आणि आम्हाला आकाशात उडताही येत नव्हते,म्हणून काय झाले 'आम्ही जोराने धावायचे नाही?की आकाशात उडायचे नाहीं?'आम्ही चित्यापेक्षाही वेगाने पळालो,मास्यापेक्षाही चपळाईने पोहलो.आणि गरुडापेक्षाही उंच उडालो.आणि का नाही?आम्ही या पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी नाही का?हो 'प्राणीच' पण बुद्धिमान जरी असलो ना तरी बेजबाबदार.पण तू आलास,तू कोठूनही येवो....! आलास मात्र खरा.तुला सजीव म्हणावे तर तू नाहीस आणि निर्जीव म्हणावे तर तर तू समस्त पृथ्वी वासीयांच्या जीवात जीव ठेवला नाहीस.अंतराळात पार मंगळापार टिमक्या मिरवण्याच्या डिंगा मारणारे आम्ही आज तुझ्या धाकाने चार भिंतीत बंदिस्त झालो. मुक्तपणे जमीन,पाणी आणि आकाश इथं विहार करणाऱ्या प्राणी पक्ष्याना कधीकाळी कोंडणारे आम्ही,आज चार भिंतीत कोंडल्या गेलोत. आम्हांले वाटलं नव्हते कधी...!,कधी असं होईल म्हणून.आम्ही या पृथ्वीचे मालक.नव्हे राजे....!ही फक्त आमच्यासाठीच.इथली जमीन, सागर,समुद्र,आकाश सुद्धा फक्त आमचंच.इतर प्राणी,पक्षी यांच्यावर सुद्धा आमचाच अधिकार.अन आम्ही मन वाटेल तसे उपभोग घेऊ याचा.आणि तुझ्यासारखे किती तरी जिवाणू,विषाणू आम्ही लीलया खेळवतोय बघ. पण तू मात्र या खेळात छान मजा आणलीस.पाहिल्यांदा हा मग्रूर आणि पार अवकाशात पोचलेला माणूस तू खेळवलाय बघ,नव्हे छळवलाय.आम्ही आखलेल्या देशांच्या सीमा,धर्माच्या भिंती तू पार एका क्षणात ढासळून टाकल्या. आमच्या अनुपस्थितीत मोकळा श्वास घेणारी हवा,स्वतःतचं रममाण होणारं निळं निळं पाणी आणि मुक्तपणे बागडणारे पक्षु पक्षी आज आम्हांला सांगतात की तुमची निसर्गाला काहीच गरज नाही आणि तीच आमची लायकी आहे
शब्दाणकन ::
✍हेमंत साहेबराव पापळे,कारंजा(लाड),जिल्हा वाशीम,9422762278