कोरोना योद्धा-- मनीष रामदास पवार
.कारंजा : जगभर आणि देशभर कोरोना संसर्गाचे थैमान माजले असताना,त्यात देशाची आर्थिक राजधानी तर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. जिथे मोकळा श्वास घेणे कठिण आहे तिथे कोरोनामुळे जीवन जगणे असह्य झालेले आहे.२०-२० तास लॉक डाऊन मुळे नाईलाजास्तव घरात अडकून पडलेल्या मुंबईकरांची अवस्था तर सांगायलाच नको.
सध्या संपूर्ण मुंबई कोरोनामुक्त करण्याचा विडा उचलला आहे महाराष्ट्र शासनाने, त्यासाठी अहोरात्र झटतेय पोलीस प्रशासन व संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका व त्यांचे कर्मचारी .यांच्याच खांद्यावर मुंबईला कोरोनामुक्त व संसर्गापासून रोखण्याची जबाबदारी आली आहे. आणि हे कर्मचारी सुद्धा सक्षमपणे व समर्थपणे या लढाईला तोंड देण्यासाठी तयार आहे. केवळ नोकरी व कर्मचारी आहे म्हणून हे कार्य करत नसून त्यामागे सेवाभाव प्रकर्षाने दिसून येत आहे.तशी मुंबईकरांची जिंदादिली प्रत्येक संकटावेळी वाखाणण्यासारखी असते.
मुंबई च्या या कोरोना संग्रामात पुढे होऊन आपली सेवा देतोय कारंजा शहरातील युवक श्री मनीष रामदास पवार- कनिष्ठ अभियंता बृहन्मुंबई महानगरपालिका. आपल्या वाशीम जिल्ह्यात कोरोनाचा एकही पेशंट नाही ही दिलासा देणारी आहे.पण मुंबईतील कोरोनाग्रस्तांची काळजी घेणारा एक अधिकारी आपल्या कारंज्याचा आहे,ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.
मनीष पवार हे मूळचे कारंजा येथील बायपास परिसरात राहणारे असून मागील 12 वर्षापासून मुंबईला कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण जे.डी. चवरे विद्यामंदिर येथे झाले आहे. वडील सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून आई महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय विभागातून सेवानिवृत्त झाल्या आहेत.
मनीष पवार बीएमसी च्या एम पश्चिम भागातील चेंबूर येथे स्वच्छता व मलनि:सारण विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहे. कोरोना संसर्गामुळे जबाबदारी वाढली असून लाखाच्या वर लोकसंख्या असलेल्या चेंबूर मधील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी झटत आहे.
आपल्या अधिनस्त कर्मचारी व कंत्राटदार यांच्या साहाय्याने ऑनलाईन व कंट्रोल रूम वर दाखल झालेल्या तक्रारींचे त्वरित निपटारा करणे, संपूर्ण परिसराचे सनिटायझेशन व हाय क्लिनिंग करणे, कोरोना संशयित परिसराची विशेष काळजी घेणे व जनतेची जागृती करणे,अशाप्रकारची कामे स्वतःच्या देखरेखीखाली करतात.
या विभागातील अधिकारी व कर्मचारी म्हणजे या लढाईतील कोरोनाशी दोन हात करणारी पहिली फळी होय.
स्वतःची व कुटुंबाची काळजी घेऊन जनतेच्या आरोग्याची काळजी वाहणारा हा योध्दा कारंजा शहरासाठी अभिमानाची बाब आहे.
"पहाटे ४ वा सुरू होणारी दिनचर्या आटोपून रात्री जेंव्हा घरी परततो तेंव्हा आपल्या मुलांना जवळ घेऊन गोंजारू सुद्धा शकत नाही, याचे दुःख होते. पण आपण करीत असलेल्या कामाचं समाधान वाटतं. ही सेवा करण्याची क्षमता निर्माण करण्याची किमया केवळ कारंज्याच्या मातीतच आहे. असे भावोद्गार मनीष पवार यांनी काढले.
दिसणाऱ्या शत्रूंशी सामना करणे सोपे आहे. पण अदृश्य शत्रूंशी सामना करणे म्हणजे मृत्यूला ओढवून घेणे होय. याकरिता आपण घरातच राहून सामना करू शकतो व सुरक्षित राहू शकतो.
कोरोना या अदृश्य शत्रूंशी सामना करणाऱ्या मनीष पवार या कोरोना योध्याला कारंजेकरांचा सलाम.
.
संकलन
उमेश माहितकर
कारंजा लाड़