भारतीय रेल्वे झाली गुरुवारी १६७ वर्षाची
प्रवाशांविना सुन्न वातावरणात रेल्वेचा वाढदिवस
कुठल्याही गाडीत एकही प्रवासी नसलेला रेल्वेचा हा पहिलाच वाढदिवस होता.
भारतीय रेल्वेला गुरुवारी १६७ वर्षे पूर्ण झाली असून रेल्वेचा हा वाढदिवस प्रवाशांविना सुनासुना गेला. कुठल्याही गाडीत एकही प्रवासी नसलेला रेल्वेचा हा पहिलाच वाढदिवस होता.
पहिली प्रवासी रेल्वे मुंबई (बोरीबंदर) ते ठाणे दरम्यान १६७ वर्षांंपूर्वी १६ एप्रिलला धावली होती. रेल्वे सुरू झाल्यानंतर १९७४ मध्ये पहिल्यांदा मे महिन्यात रेल्वेचा संप झाला होता तो तीन आठवडे चालला. त्यावेळी चालक, स्टेशन मास्तर, सुरक्षा रक्षक यांनी चक्का जाम आंदोलन करून रेल्वे चालकांचे कामाचे तास निश्चित करून वेतनवाढीची मागणी केली होती.
ऑल इंडिया रेल्वेमन फेडरेशनचे माजी सरचिटणीस शिवगोपाल शर्मा यांनी सांगितले की, त्यावेळी आमचे नेते जॉर्ज फर्नाडिस यांनी रेल्वेमंत्र्यांबरोबर समझोता घडवून आणला होता, पण पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी वाटाघाटी मात्र अपयशी ठरल्या होत्या. फर्नाडिस यांना त्यावेळी लखनौत अटक झाली होती. कामगारांनी जोखीम पत्करून लढा दिला होता. चार दशकांपूर्वीही मालगाडय़ांच्या मार्गावरून काही प्रवासी गाडय़ा जाऊ देण्याच्या मुद्दय़ावरून रेल्वे वाहतूक विस्कळित झाली होती.
हावडा ते दिल्ली काल्का मेल सारख्या मार्गानी काही गाडय़ा चालवण्याचा मुद्दा होता. त्यावेळी झाली तशी रेल्वे सेवा कधीच विस्कळित झाली नव्हती.
पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती. गुरुवारी भारतीय रेल्वे मंत्रालयाने रेल्वेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ३ मे पर्यंत रेल्वे प्रवासी सेवा बंद असल्याने प्रवाशांविनाच रेल्वेचा वाढदिवस झाला. रेल्वेच्या १५,५२३ गाडय़ा असून त्यात ९ हजार प्रवासी गाडय़ा, तर तीन हजार मेल एक्स्प्रेस गाडय़ा आहेत.