*एप्रिल* एप्रिल फुल कोण...?*
*एप्रिल महिना* म्हटला की ज्या काही ठळक गोष्टी आठवतात त्यात म्हणजे , एप्रिल महिन्याची पहिलीच तारीख १ एप्रिल जी *"एप्रिल फुल "* दर्शविते. थोडासा संपूर्ण महिना जर नजरेखालून घातला तर लक्षात येईल की मूर्ख बनविणाऱ्या पहिल्या तारखेत आणि बाकी तरखेत किती विसंगती आहे. ज्या महिन्यात *प्रभू श्रीराम, भ महावीर, श्री वीर हनुमान , डॉ आंबेडकर, महात्मा फुले, ईस्टर, आद्य शंकरराचार्य जयंती, परशुराम जयंती, आणि थोडे पुढे गेल्यास बौद्ध पौर्णिमा आहे.* इतक्या साऱ्या महापुरुषांनी जन्म घेऊन आपल्या कर्तृत्वाने या संपूर्ण जगास ज्ञानाची गंगा दिली , ज्यांच्या तत्वज्ञानाने व समाजसेवेने अनंत उपकार या समाजावर केले अशा असामान्य महापुरुषांच्या जन्माच्या महिन्याच्या पहिल्या तारखेलाच आपण मूर्ख म्हणावं..?, म्हणजे हा किती शहाणपणा...!
पण एका दृष्टीने विचार केला तर खरंच *आपण मूर्ख आहोत..!* कारण ती पहिली तारीख आपल्या सारख्या सामान्यांसाठी आहे. कारण एवढे अनमोल तत्वज्ञान सांगणारे आपल्या देशात होउून गेलेत. त्यांनी या महिन्यातील कडक उन्हाप्रमाणे स्वतःला तापवून, सलाखून अपरिमित कष्ट घेऊन अनंत हाल अपेष्टा सहन करून तुम्हाला उपदेश दिला आणि तुम्ही मात्र त्याच्या विपरीत वागून फक्त त्यांची कोरडी अस्मिता बाळगून, त्यांचा स्वार्थी उपयोग करून घेतला. हे दुसरे काही नसून शुद्ध मूर्खपणाचा नव्हे काय.? या जगात एकही महापुरुष असा नाही की ज्याने समाजाला शिकवण देत असताना त्यांच्याकडून यातना, त्रास सहन केला नाही. जितकी चांगली शिकवण त्यांनी समाजाला दिली, जेवढं प्रेम, दया, करुणा, सत्य, संयम, अहिंसा अश्या अनेक गुणांचा आग्रह समाजाला केला तेवढाच छळ, उपहास, क्रूरता, विडंबना व विरोध ते हयात असतांना त्यांना लोकांनी दिला आणि ते गेल्यानन्तर मात्र त्यांचा जन्मोत्सव,जयंती, प्रगट दिन ,उत्सव साजरा करण्याच सोंगही हाच समाज करत आला आहे. त्यांच्या मौलिक तत्वज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनात करून आपले जीवन सार्थक करणारे हे अगदी बोटावर मोजण्याइतके आणि त्यांचा राजकीय, व्यावसायिक व स्वार्थीपणाने उपयोग करणारे अधिक असे चित्र आज आपल्याला पाहायला मिळते.
अश्या कोणत्याच बाह्य गोष्टींचा दिखावा न करता, त्यांच्या बनावट अस्मितेचा गाजावाजा न दर्शवता त्या प्रत्येकाने सांगितलेल्या तत्वाचा काही अंशही आपण अंगिकारला, आचरणात आणला तरी आपल्या जीवनाचे निश्चित सार्थक होईल. संपूर्ण एप्रिल महिना जरी त्यांच्या महानतेंच प्रतीक असला तरी त्याची पहिली तारीख ही आपल्यासारख्या मूर्ख लोकांची वृत्ती दर्शवते, आणि म्हणून पहिल्या तारखेला आपण मूर्ख बनून पुढच्या तारखेपासून त्या सर्व महान तत्ववेत्यांच्ये शहाणपण अंगिकारायला पाहिजे असं मला वाटते.
*लेखन : आशिष बंड जैन. कारंजा.*