कोरोनाच्या पार्श्वभुमीवर उपाययोजना व समस्यांचा आमदार पाटणी यांनी घेतला आढावा

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर उपाययोजना व समस्यांचा आमदार पाटणी यांनी घेतला आढावा




कारंजा: ( ललित तिवारी याजकड़ून)

 

        कोरोना चा दुर्भाव रोखण्यासाठी मतदार संघात केलेल्या उपाययोजना तसेच या परिस्थितीत उद्भवलेले प्रश्न यासंदर्भात आमदार राजेंद्र पाटणी यांनी २० एप्रिल रोजी स्थानिक विश्रामगृहात संबंधित अधिकार्‍यांची बैठक बोलावून समस्या जाणून घेतल्यात. यावेळी सर्व विभाग प्रमुखांनी केलेल्या उपाययोजना व  समस्या संदर्भात  आमदार पाटणी यांना अवगत केले.  सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी समन्वयाने काम करून मतदार संघातच नव्हे तर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होता कामा नये त्या दृष्टिने काम करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिलेत.  

प्रशासनाच्या उपाययोजना व विभाग प्रमुखांच्या समस्यांवर आमदार पाटणी यांची भुमिका. 

आरोग्य विभाग: खबरदारीचा उपाय म्हणून उपजिल्हा रूग्णालयात ५० खाटांचे प्रतिबंध व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. याशिवाय औषधसाठा व पुरेशी वैद्यकीय सामग्री सांगत असतांना रुग्णालय अधीक्षकांनी ५० खाटांवरील जुन्या गाद्या व पीपीई किट संदर्भात आमदार महोदयांचे लक्ष वेधले. याबाबत आ.पाटणी यांनी मा.जिल्हाधिकारी यांना फोन करून अवगत केले, ज्यावर जिल्हाधिकारी,वाशिम यांनी तातडीने दखल घेत येत्या एक-दोन दिवसात ५० गाद्या उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे कारंजा व मानोरा येथील अपुर्‍या पीपीई किट संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सुध्दा आजरात्रीपर्यंत संबंधित रूग्णालयास पोहचविणार असल्याचे सांगितले.

महसुल विभाग: तहसीलदार मांजरे यांनी राशन पुरवठा, मोफत अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवेशी निगडीत पासेस याशिवाय प्रत्येक राशन दुकानावर दोन शिक्षकांच्या करण्यात आलेल्या नियुक्त्या संबंधी माहिती दिली. यावेळी ज्या राशन धारकांनी काळाबाजार किंवा अफरातफर केली अशांवर कडक कारवाई करण्याच्या सुचना आ.पाटणी यांनी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना केल्यात. 

पोलिस प्रशासन: संचारबंदी काळात उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील यांनी वाहन तसेच अवैध दारूविक्री संबंधी केलेली दंडात्मक कारवाई, अत्यावश्यक सेवेत दुकानदार व नागरिकांना जागृत व उपाययोजनांबाबत माहिती दिली. जिल्हा सिमेवर तैनात पोलिस कर्मचार्‍यांना पीपीई किट व सॅनिटायझरचा पुरेसा साठा नसल्याबाबत अवगत करताच अशा कर्मचार्‍यांची तातडीने माहिती घेऊन त्यांनी आपण स्वत: उपलब्ध करून देऊ असे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले. मुख्य रस्त्यांशिवाय ग्रामीण रस्त्यांच्या ज्या इतर जिल्ह्याच्या संबंधित आहेत अशा सीमा सुध्दा सिल करण्याच्या तसेच वृध्द, महिला, आजारी व्यक्ती यांच्यावर बळाचा वापर न करण्याच्या सूचना त्यांनी पोलिस प्रशासनला केल्यात. 

नगर परिषद प्रशासन: मुख्याधिकारी तसेच तहसीलदार यांनी संभाव्य परिस्थिती लक्षात घेता अडकलेले प्रवासी, बेघर नागरिक व मजूर यांची दक्षता घेऊन त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी कल्या.

पाणी पुरवठा: मानोरा येथील पाईपलाईन दुरूस्तीचे काम सुरू असल्यामुळे टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यासंदर्भात आमदार पाटणी यांनी केलेली मागणी जिल्हाधिकारी यांनी तातडीने मान्य केली आहे. त्यामुळे लवकरच टँकरव्दारे सुरळीत पाणी पुरवठा सुरू होईल यानिमित्ताने त्यांनी मानोरावासीयांना आश्वस्त केले. 

आयोजित बैठकीला तहसीलदार मांजरे, मुख्याधिकारी डॉ.कुरवाडे, गटविकास अधिकारी तापी, उपजिल्हा रूग्णालयाचे डॉ.तपासे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किरण जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील, ठाणेदार सतीश पाटील, ठाणेदार जाधव, सा.बां.विभागाचे मेश्राम याशिवाय संबंधित अधिकारी व कर्मचारी तसेच भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.राजीव काळे, शहराध्यक्ष ललित चांडक आदींची प्र्रामुख्याने उपस्थिती लाभली होती.