पुस्तक...Friends forever....  

पुस्तक...Friends forever....


                      .          आम्हा घरीं धन शब्दाची च रत्ने l शब्दाची च शस्त्रे यत्न करूll शब्द चि आमुच्या जीवाचे जीवन  l शब्दे वाटू धन जनलोका ll  तुकोबारायांनी फार सुंदर अशा शब्दात शब्दांची महती सांगितली आहे आणि या शब्दांचा आविष्कार म्हणजेच पुस्तक असते.असे म्हणतात की निसर्गचं मानवाला शिकवतो आणि त्या निसर्गाचाच एक आविष्कार म्हणजे पुस्तक ,मित्र सदासर्वदा.जरी पुस्तक माणूसलिहतो आणि घडवतो तरी कर्ता मात्र निसर्ग असतो.पुस्तक या शब्दाचा मतितार्थ खूप विस्तृत असा आहे.धुळपाटीवर ग भ न ....ची सुरुवात होते आणि त्या मुलाची  ओळख होते त्याच्या आयुष्यातिल पहिल्या पुस्तकासोबत म्हणजे ज्याला उजळणी म्हणतात.मग हळूहळू त्या त्या वर्गांच्या पाठपुस्तकांसोबत ओळख होते.जसं जसं ते मूल मोठं होतं तसा त्याचा परिचय एकेका पुस्तकप्रकारासोबत होतो.मूळची आवड म्हणा किंवा मग कोणी तरी जाणता करून देतो.कवीमनाचा असेल तर तो कविता संग्रहाकडे वळतो.कोणी कादंबरी,लघुकथा,कोणी एखाद्याचे चरित्र वाचून प्रभावित होतो.उजळणी,पाठपुस्तके, कवितासंग्रह, कादंबरी,लघुकथा,चरित्र,हे जरी पुस्तकाचे प्रकार असले तरी यावरून पुस्तक या शब्दाचा अर्थ किती विस्तृत आहे हे ध्यानात येते.वयाच्या वेगवेगळ्या टप्यावर प्रत्येकजण पुस्तकाच्या वेगवेगळ्या प्रकारासोबत मैत्री करतो,काही जण तात्पुरती मैत्री करतात तर काहि जणांसाठी ती मैत्री कायमस्वरूपी असते.आणि मग पुस्तकांशी कायमस्वरूपी मैत्री करणारे जगाला दिशा दाखवण्याचे काम करतात.ते कुणाचेही हस्तक तर होतंच नाही उलट त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर जग चालत असते.एवढि किमया पुस्तके घडवून आणतात.पुस्तकेच तर जगात क्रांति घडवून आणतात,नाही तर पुस्तकांच्या धाकाने त्यांच्यावर बंदी घालण्याची उदाहरणे इतिहासात घडलीच नसती.पुस्तके वाचल्याने माणसाचं मस्तक सशक्त होतं, आणि सशक्त झालेलं मस्तक कुणाचं हस्तक होत नसतं. हल्ली भरकटलेली,कुणाची तरी कार्यकर्ते झालेली पिढी कशाचं द्योतक आहे तर वाचनसंस्कृती लोप पावत असल्याची.ज्यांचं मस्तकंच सशक्त नाही ते कोणाचेतरी हस्तक होणारंच. "वाचाल तर वाचाल"असे म्हणतात ते काही उगाचंच!एखादा लेखक जेव्हा पुस्तक लिहतो तेव्हा त्याचे जगणे,अडखडणे,ठेचकाळने तो जगासमोर मांडत असतो.लेखकाचा जीवनप्रवास म्हणजे त्याचा हा आविष्कार असतो.आणि आपण ते वाचून आपलं जगणं समृद्ध करत असतो.लेखक आपल्या सोबत त्या पुस्तकाद्वारे बोलत असतो.आपले अनुभव सांगत असतो.आपण त्याचे जगणे सुद्धा जगत असतो.ही किमया आहे पुस्तकांची.आज कोणतीही  मोठी व्यक्ती घ्या त्यांचा वाचनअनुभव विचारा?त्यांची आणि पुस्तकांची मैत्री आजही  घट्ट असल्याचे ते सांगतील.सुदैवाने आपल्या मराठी भाषेमध्ये पुस्तकांचे विश्व खूप समृद्ध आहे,त्यात प्रत्येकाने शिरून आपले जगणे समृद्ध करून घेऊन लाभलेल्या मानवजीवनाचे सार्थक करून घ्यावे.


✍✍ हेमंत साहेबराव पापळे सहाय्यक शिक्षक, प.स.मूर्तिजापूर, जिल्हा अकोला 9422762278.  hemantpapale@gmail.com