१३६ की मी चालत आलेल्या १२ वर्षांच्या चिमुरडीने घर फक्त एका तासाच्या अंतरावर असताना घेतला अखेरचा श्वास घेत

 


 



दगडालाही रडवणारी लहानग्या"जमलो" च्या मृत्युची भयाण कहाणी


लॉकडाऊनची बळी ’ती’ 136 किमी चालली, घरापासून तासाभराच्या अंतरावर सोडले प्राण


रायपुर: (म टा साभार) दी 21


             लॉक डाउन असल्याने जगण्याची कोंडी फोडण्यासाठी तेलंगणहून छत्तीसगडचा प्रवासाला निघालेली एक 12 वर्षांच्या चिमुडीने घर फक्त एका तासाच्या अंतरावर असताना अखेरचा श्वास घेत अनंताच्या प्रवासाला निघाली. केवळ 12 वर्षांची असतानाही घरच्या गरिबीमुळे या चिमुरडीला कामासाठी तेलंगणमध्ये जावे लागले होते. जमलो मकदम असे या मुलीचे नाव आहे.
ही मुलगी छत्तीसगडमधील बीजापूरची राहणारी होती. जेथे ती काम करत होते ते तेलंगणमधील ठिकाण तिच्या गावापासून 150 किमीच्या अंतरावर होते. पहिल्या टप्प्यातील 21 दिवसांच्या लॉकडाउनमध्ये ती तेलंगणमध्येच राहिली. मात्र, पुन्हा 3 मेपर्यंत लॉकडाउन वाढवल्यानंतर तिचा संयम तुटला. तिने घरी चालत जाण्याचा निर्णय घेतला. ती सतत तीन दिवस चालत होती. तिचे गाव एका तासाच्या अंतरावर होते आणि चालताना अचानक तिला चक्कर आली आणि ती खाली कोसळली. तिचे त्याच जागी प्राण गेले. तिच्या पोटात दुखत होते, तरी देखील ती चालत होती, असे तिच्या सोबत असणारे सांगतात.
जेव्हा दुसर्‍या टप्प्यातील लॉकडाउन वाढवला गेला, तेव्हा जमलोसोबत मिरचीच्या शेतात काम करणारे इतर 11 जणही तिच्यासोबत पायी निघाले. हे सर्व लोक महामार्गाने न जाता जंगलातून जात होते. कारण जंगलातून गेल्यास ते अधिक लवकर घरी पोहोचणार होते. मात्र, जमलो ची तब्येत बरी नव्हती. अनेकदा तिने उलट्याही केल्या. तिचे घर 14 किमीवर होते आणि ती कोसळली. जमलो घरी तर पोहोचली मात्र जीवंत नाही. एका अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे तिचे शव घरी नेण्यात आले.
जमलो ही दोन महिन्यांपासून तेलगणमध्ये काम करत होती, असे तिच्या वडिलांनी सांगितले. जमलो ही कुपोषित होती, शिवाय तिच्या शरीरातील पाणीही कमी झाले होते, असे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइटचा असमतोल झाला असावा असेही डॉक्टरांना वाटत आहे.
देशातील विविध राज्यांमध्ये स्थलांतरित मजूर अडकले असून अनेकांनी पायी घरी जाण्याचा मार्गही पत्करलेला आहे. तसेच या मजुरांपैकी अनेकांना अनेक प्रकारचे त्रास सहन कराव्या लागल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झालेल्या आहेत.


( म टा साभार )