कारंजा शहर बनतोय सॅनीटायझेशन हब, एक सॅनीटायझेशन झोन सुरु; दोन लवकरच सुरु होणार 

 


शहरात लावले 'हॅन्डवॉश' सेंटर तसेच 'सॅनिटाझर टनेल' सेंटर


*शहरातील स्वच्छतेसह निर्जंतुकीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरू* 


कारंजा ( कारंजा वृत्तकेसरी ) दि १२ एप्रिल


कोरोना विरुद्ध लढण्यासाठी नगरपालिकेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. शहरातील निर्जंतुकीकरण मोहीम तसेच स्वच्छता मोहीम नंतर शहरातील तीन मुख्य ठिकाणी 'हॅन्डवॉश' सेंटर तसेच मुख्य चौकात 'सॅनिटायझर टनेल' मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बसविण्यात आले आहे.
       कोरोना विरोधात लढण्यासाठी  निर्जंतुकीकरण यंत्र तयार करून पालिकेच्यावतीने हे मशीन डॉ.आंबेडकर चौक येथे उभारण्यात आले आहे. कोरोनाच्या या अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच येणाऱ्या नागरिकांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून पालिका प्रशासन युद्ध पातळीवर उपाययोजना करत असून या उपाययोजनेतर्गतच खबरदारी म्हणून हे निर्जंतुकीकरण मशीन उभारण्यात आले आहे.
या अत्याधुनिक मशीनमध्ये १००० लिटर पाण्याची टाकी लावून त्यामध्ये पॉलिमेरिक बेक्यूनाइड हैड्रोक्लोराईडचे ०.५ टक्के हे प्रमाण वापरून निर्जंतुकीकरण करण्यात येते.या अत्याधुनिक निर्जंतुकीकरण मशीनमध्ये व्यक्तीने प्रवेश केल्यानंतर सेन्सर कार्यान्वित होऊन स्प्रे सुरू होतो. १० सेकंदांमध्ये संपूर्ण शरीरावर सॅनिटाझर स्प्रे होऊन व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज असून न.प.आरोग्य निरीक्षक विनय वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागातील तसेच कर विभागातील कर्मचारी सतत युद्धपातळीवर कार्य करीत असून नगराध्यक्ष शेषराव ढोके,आरोग्य सभापती सलीम गारवे, सर्व खात्यातील सभापती तसेच नगरसेवक वेळोवेळी या संपूर्ण कार्याचा आढावा घेऊन सूचना देत असल्याची माहिती नगर पालिका प्रशासनाने दिली आहे


सॅनिटायझर टनेल' मुळे १० सेकंदामध्ये निर्जंतुकीकरण प्रक्रिया पूर्ण होणार आहे.अत्यावश्यक कामानिमित्त बाहेर येणाऱ्या नागरिकांसह अधिकारी व कर्मचारी यांना यामुळे कोणत्याही व्हायरसची बाधा होऊ नये हा मुख्य उद्देशाने हे लावण्यात आले आहे.


 









एक सॅनीटायझेशन झोन सुरु; दोन लवकरच सुरु होणार 


योग्य प्रकारे सॅनिटायझेशन शक्य व्हावे यासाठी सद्यस्थितीत ३ सॅनिटायझेशन झोन सुरु करण्यात येत असून यांतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील १ सॅनिटायझेशन झोन कार्यान्वित झाले असून बायपास येथील झोन उभारणी कार्य सुरु आहे तर तिसरे व सर्वात मोठे सॅनिटायझेशन झोन हे लवकरच जयस्तंभ चौक येथे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य निरीक्षक विनय वानखडे यांनी दिली. तिन्ही जागांवरील प्रतिसाद पाहिल्यानंतर शहरातील आणखीन काही भागात असे झोन सुरु करण्यात येऊ शकतात, अशी माहितीही त्यांनी दिली. 

तसेच शहरात आंबेडकर चौक, शिवाजी चौक व महात्मा फुले चौक या भागांमध्ये हात धुणेसाठी तीन सॅनीटायझेशन हॅन्डवॉश सेंटर सुरु करण्यात आलेले आहे. 

कारंजा नगर परिषद स्वच्छता विभाग हे आपल्या परिने सर्व ते प्रयत्न करीत असून नागरिकांनीही शासनाने वेळोवेळी दिलेले आदेश पालन करुन तसेच घरीच राहून व विनाकारण रस्त्यावर न येता प्रशासनास सहकार्य करुन ह्या रोगाला सर्वांनी मिळून हरविण्याचे कार्य करावे, असे आवाहन आरोग्य निरीक्षक विनय वानखडे यांनी केले आहे.